Home › News & Media › विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या श्री चोरमलेची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड
School News

विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या श्री चोरमलेची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड

📍 Latur, Maharashtra · 📅 02 October 2026 · 📰 Published in: विश्वविद्या
*विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रात दबदबा; व्हॉलीबॉलमध्ये तालुक्यात प्रथम, वुशूमध्ये विभागात अव्वल; राज्यासाठी निवड*

लातूर, दि. ३० सप्टेंबर : विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल, लातूरच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अंडर-१९ मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत शाळेच्या संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तसेच तायक्वांदो, वुशू आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

अंडर-१९ मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट तंत्र, संघभावना, आत्मविश्वास आणि जिद्दीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रणिता सूर्यवंशी, पायल सरवदे, समीक्षा सूर्यवंशी, अंकिता जाधव, नंदिनी सूर्यवंशी, अदिती सोनवणे, सिद्धी पाठक आणि शर्वरी मुकुंद भांगे या विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे संघाची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, पुढील स्पर्धेत या विद्यार्थिनी लातूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

यापूर्वी झालेल्या तायक्वांदो स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. श्री. चोरमले यांनी ६८ ते ७३ किलो वजनी गटात, तर उमेर काझी यांनी ६३ ते ६८ किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली होती.

दरम्यान, विभागीय स्तरावर झालेल्या वुशू स्पर्धेतही विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. यू-७० किलो वजनी गटात श्री. चोरमले यांनी विभागात प्रथम क्रमांक, तर यू- ६५ किलो वजनी गटात उमर काझी यांनी विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

याचबरोबर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत बौद्धिक क्रीडा प्रकारातही आपली गुणवत्ता सिद्ध केली. विद्यार्थ्यांनी एकाग्रता, तर्कशक्ती, नियोजन आणि निर्णयक्षमतेचे प्रभावी प्रदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य बसवेश्वर धाराशिवे, कॅम्पस डायरेक्टर किशोर जेवे, व्यवस्थापकीय संचालक ऋतिक धाराशिवे, प्राचार्य अमोल कुंभार, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर हादवे, मार्गदर्शक शिक्षिका कोमल वडसकर तसेच शिक्षक व पालकांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष शिवचरणजी धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकरजी कापसे तसेच सहसचिव महादेवजी खिचडे यांनी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण क्रीडा कामगिरीचे कौतुक करत जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

व्हॉलीबॉलमध्ये तालुक्यात प्रथम, तायक्वांदोमध्ये जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी, वुशूमध्ये विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक आणि बुद्धिबळात द्वितीय व तृतीय क्रमांक अशी विविधांगी कामगिरी करत विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूलने क्रीडा क्षेत्रातील आपली यशस्वी परंपरा अधिक भक्कम केली आहे. विशेष म्हणजे वुशू स्पर्धेत आता श्री. चोरमले आणि उमेर काझी हे राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी उंची प्राप्त झाली आहे.
← Back to News